मुंबई दि. ०४ फेब्रुवारी –
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने निवडणुकीच्या काही महिने आधी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची घोषणा करत या योजनेचा बहिणींना लाभ देणे सुरू केले होते. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे या योजनेचं मोठ योगदान असल्याचं सांगितलं जातं. मात्र सत्तेमध्ये येतात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचं आता सरकारला वाटत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडल्याचं सांगितलं जातं. तो कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तेव्हा काही निकष ठरविण्यात आले होते. मात्र या नियमांची पायमल्ली करून अनेक महिलांनी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे या अर्जांची छाननी न झाल्याने अनेक अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता सरकारने ॲक्शन मोडवर आलं आहे.
चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही चारचाकी महिलेच्या नावावर नसेल, मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तरीही त्यांना या योजनेतून बाद केलं जाईल.
यासाठी लाडक्या बहिणांच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यावेक्षीका घरोघरी जाऊन चारचाकी कार असल्याची पडताळणी करतील, अशी माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेचे काही निकष… ज्या महिलांचं कुटुंब आयकर भरते अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे, त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहीणीचा लाभ घेता येणार नाही.