संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी –
संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा फसवी ठरली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पालकमंत्र्यांनी संगमनेरकरांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे बोलले जात आहे. यावरून पालकमंत्री साहेब राजकारण करा पण संगमनेर तालुक्याच्या अस्मितेशी खेळू नका, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे. अशा शब्दात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जाहीर केलेल्या निधीचे काय झाले, तो निधी अद्याप का मिळाला नाही अशी विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा निधी या समितीच्या माध्यमातून देता येत नसल्याचे स्पष्ट करत या संदर्भात सरकारचे मार्गदर्शन मागविल्याचे म्हटले होते. त्यामुळे अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा विकास निधीच्या माध्यमातून एक कोटी रुपये देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा फसवी ठरली आहे.
संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शिवसेनेने सर्वप्रथम केल्याचे निदर्शनास आणून देत अमर कतारी यांनी यासाठी शिवसेना व शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून अकरा लाख रुपयांचा निधी देखील देण्याची घोषणा करत नगर परिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे यासाठीच्या प्रस्ताव देखील पाठविला होता. आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला.
हा पाठपुरावा सुरू असतानाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरच्या बसस्थानक प्रवेशद्वाराबाहेर बसविल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र तो निधी आता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी आपली नाराजी स्पष्ट केली आहे.
कतारी म्हणाले, पालकमंत्री साहेब, राजकारण करा पण संगमनेरकराच्या अस्मितेशी खेळू नका. तुम्हाला नेमका संगमनेरकरांवर कोणता राग आहे हे समजायला मार्ग नाही. तुमची वैयक्तिक कोणाशी दुश्मनी असेल तर खुशाल राग काढा, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आपण संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी एक कोटी रुपये निधी देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जी घोषणा केली होती, ती खोटी असल्याचे समजले. खूप वाईट वाटले. राजकारण झालं… छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा खोटी ठरली. शिवभक्तांना अजून किती वर्ष वाट पहावी लागेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी अश्वारूढ पुतळा होईल? राजकारण जरूर करा पण छत्रपतीच्या बाबतीत नाही. अस म्हटलं आहे. कतारी यांनी आपली नाराजी समाज माध्यमातून जाहीर केली आहे.