अहिल्यानगर, दि. ०६ फेब्रुवारी –
गरजू रुग्णांना झटपट मदत मिळावी यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अहिल्यानगर मध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात शेजारी या योजनेचे कार्यालय सुरू केले जाणार आहे.
गंभीर आजारावरील उपचारासाठी गरजू नागरिकांना, रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक मदत दिली जाते. यासाठी संबंधितांना मदतीकरिता मुंबईला संपर्क करावा लागत असे. आता मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुरू करण्यात येत असल्याने जिल्हास्तरावर रुग्णांना मदत उपलब्ध होण्यास सुरुवात होणार आहे.
आजाराचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे, रुग्णालय सलग्नी करण्यासाठी, विविध निकष ठरविण्यासाठी शासनाकडे ही समिती शिफारस करेल. यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला असून यामुळे जिल्हास्तरावर अनेक गरजू रुग्णांना या योजनेचा फायदा मिळण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मदत मिळण्याकरिता सध्या अस्तित्वात असलेल्या २० आजारांपैकी इतर सरकारी योजनेत समाविष्ट असलेल्या आजाराचे पुनर्विलोकन करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे शिवाय समिती सहाय्यता मिळण्याकरता नवीन आजार समाविष्ट करण्याबाबत देखील सरकारकडे शिफारस करू शकते.