संगमनेरमधील कचरा लाख मोलाचा असून या कचऱ्याच्या माध्यमातून लाखो रुपये नगर परिषदेला मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे प्रा. डॉ. संजयकुमार दळवी होते.
कोकरे म्हणाले, संगमनेर शहरातील कचऱ्याचे लवकरच व्यवस्थापन केले जाणार असून कचरा व्यवस्थापना अंतर्गत समाज जागृतीसाठी अभियान हाती घेतले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणजे विविध स्पर्धांचे आयोजन यासाठी केले जाणार आहे.
तसेच शहराच्या वैभवात भर घालणारे कवी अनंत पंडित नाट्यगृह लवकरच महाराष्ट्रातील एक परिपूर्ण नाट्यगृह ठरेल असे देखील ते म्हणाले. यावेळी प्राध्यापक दळवी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.