निवडणूक विशेष | अनंत पांगारकर
अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पायाभरणी सहकाराच्या माध्यमातून झाली आहे. या जिल्ह्यात सहकारातील दिग्गज नेते असून आपापला सहकार त्यांनी आपल्या माध्यमातून शाबूत राखला आहे. जिल्ह्यातील या दिग्गजांमध्ये आजी-माजी मंत्री राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा बोलबाला आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीपासून विशेषतः अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार सुजय विखे यांच्या पराभवानंतर असलेले राजकीय वैर मोठ्या प्रमाणात वाढले होते. परिणामी संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि अमोल खताळ यांच्या रूपाने महायुतीच्या नव्या आमदाराचा उदय झाला.

विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरची राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे निर्माण झाली. खताळ यांच्या विजयामध्ये विखे पिता पुत्रांची ताकद असल्याने ते आपल्यासाठी दैवत असल्याचे खताळ यांनी वारंवार बोलून दाखवले. त्यामुळे संगमनेरातील आगामी निवडणुका विखे आणि खताळ यांच्या माध्यमातून महायुतीच्या झेंड्याखाली लढविल्या जाण्याचे संकेत मिळाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. आगामी निवडणुकांमध्ये देखील संगमनेरात परिवर्तन करण्याचा नारा नवनिर्वाचित आमदारांसह विखे पिता पुत्रांनी दिला. त्यामुळे संगमनेरामध्ये हिंदू धर्मियांचे सण उत्सव प्रथमत:च महायुतीकडून मोठ्या प्रमाणात साजरे होताना दिसले. त्यातच काँग्रेसकडूनही हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे झाल्याने संगमनेरमध्ये धार्मिक माहोल तयार झाला.
अशातच थोरात-विखे या दिग्गजांच्या अधिपत्याखाली असलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका देखील जाहीर झाल्या. कारखान्याच्या निवडणुकांमुळे विरोधकांमध्ये जोश निर्माण झाला. त्यातच विखे यांनी खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुका लढविणार असल्याचे संकेत दिल्याने इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती. आमदार खताळ यांनी देखील या पार्श्वभूमीवर शहरातील एका भाजप नेत्याच्या रुग्णालयात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेत थोरात कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याची घोषणा केली.
एकीकडे निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी दुसरीकडे मात्र थोरात यांच्या विरोधात पॅनल तयार करून निवडणूक लढविणे अवघड असल्याचे विरोधकांच्या निदर्शनास येऊ लागले. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवार देण्यात अपयश येत असल्याचे लक्षात आल्याने महायुतीच्यावतीने आमदार अमोल खताळ, वसंतराव गुंजाळ, बापूसाहेब गुळवे आणि संतोष रोहोम यांनी एकत्रित प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून सहकार चळवळीतील मूल्यांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत पळवाट काढत निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले.

यासाठी सभासद मतदारांच्या शेअर्सची रक्कम भरून न घेणे, अनेक मृत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे, अकोले तालुक्यातील सुमारे दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नाकारणे, मृत्यू असलेल्या सभासदांमध्ये महायुतीच्या सभासदांचा समावेश असणे, महत्त्वाचे म्हणजे सहकार चळवळीत राजकारण नको ही भूमिका घेत, विद्यमान प्रशासनाने मतदार यादी बाबत सभासदांच्या मागणीचा विचार केला नाही, सभासद असलेल्या कार्यकर्त्यांना कोणताही वैयक्तिक त्रास होऊ नये त्यांचे आर्थिक नुकसान टाळले जावे. आदी कारणांमुळे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केले.
प्रत्यक्षात मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली असून “थेट वरच्या पातळीवर पडद्यामागे घडलेल्या घडामोडीनंतर आलेल्या आदेशामुळे विखे आणि थोरात यांच्यात एकमेकांच्या कारखान्यांमध्ये हस्तक्षेप नको यावरून सेटलमेंट झाल्याच्या व दोन्ही नेत्यांचे कारखाने बिनविरोध करण्यावर एकमत झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत”. या चर्चांच्या माध्यमातून नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ मात्र आता कारखाना निवडणुकीत एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. 


