महाराष्ट्र संवाद न्यूज –
अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर (वय २२, रा. सोनई, ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने मोठ्या युक्तीने जेरबंद केले आहे. आरोपी वैरागर याला जमावाच्या मारहाणीनंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय वैरागर याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. २ मे २०२५ रोजी जमावाने केलेल्या मारहाणीत तो जखमी झाला होता, त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ७ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने रुग्णालयातील पोलिसांची नजर चुकवून पलायन केले.
आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाचा अचूक वापर करत आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अथक प्रयत्नानंतर, पथकाला आरोपी एका विशिष्ट ठिकाणी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून संजय वैरागर याला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, फुरकान शेख, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, मेघराज कोल्हे आणि चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. आरोपीला पुढील तपासासाठी सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.