२,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने करणार खरेदी
महाराष्ट्र संवाद न्यूज
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे कांद्याच्या प्रश्नावर काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागले असतानाच. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर मुंडेंनी ‘ऐतिहासिक खरेदीदरा’ची घोषणा करण्याआधीच जपान दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी ती केल्याने मुंडेंच्या श्रेयावर पाणी फेरले गेले.
मुंडे करणार होते घोषणा: केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या दिल्लीतील तीन मूर्ती मार्गावरील सरकारी निवासस्थानी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मुंडे कांदाप्रश्नी चर्चा करत होते. या चर्चेनंतर मुंडे व गोयल पत्रकारांशी बोलतील असे सांगण्यात आले होते.
मुंडेंच्या घोषणेआधीच फडणवीसांची घोषणा: या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी जपानहून साडेदहा वाजता कांदा खरेदीच्या आणि दराच्या प्रश्नावर तोडगा निघाला असल्याची परस्पर घोषणा ट्वीटद्वारे केली. फडणवीस यांच्या सविस्तर ट्वीटनंतर मुंडे यांना कांद्याच्या प्रश्नावर बोलण्याजोगे काही उरले नाही.
कांदा उत्पादकांसंदर्भात तातडीने निर्णय घेतल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री मा. पियुष गोयलजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो.
कांदा उत्पादकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचे काम आज केंद्र सरकारने केले आहे…!… pic.twitter.com/JL076U4wVP— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2023
२,४१० रुपये प्रतिक्विंटल: ‘महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जपानहून दूरध्वनीवरून संपर्क केला. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल’, अशी सविस्तर माहिती देणारे ट्वीट फडणवीस यांनी केले.
मी तीन दिवसांमध्ये गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून १५ वेळा बोललो आहे. आत्ता दिल्लीत गोयल यांच्याशी चर्चा झाली असून कांद्याला ऐतिहासिक भाव मिळालेला आहे. यापूर्वी कधीही ‘नाफेड’ने प्रतिक्विंटल २,४१० रुपयांचा भाव देऊन कांद्याची खरेदी केलेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे.
– धनंजय मुंडे, कृषीमंत्री.


