महाराष्ट्र संवाद न्यूज
केंद्र व राज्यातील सरकारवर जनतेची पूर्णतः नाराजी आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, अस्थिरता, अमली पदार्थांची तस्करी यामुळे जनता नाराज आहे. सरकारचे सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेत रोशाचे वातावरण असून आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर थोरात समर्थकांनी निर्विवाद यश मिळविले आहे. नवनिर्वाचित सदस्य सरपंचांचा थोरात यांनी सत्कार केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण केले जाते. ग्रामपंचायतमध्ये झालेला विजय हा विकास कामांचा आणि कार्यकर्त्यांच्या एकीचा आहे. या निवडणुकीत पाहिजे शक्तींनी मोठ्या प्रमाणात दबावाचा व इतर गोष्टींचा वापर केला, मात्र जनतेने त्यांना थारा दिला नसल्याचे निवडणूक निकालातून दिसून येते.
संगमनेर तालुक्यातील जनतेला त्यांची दहशत मान्य नसून आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये देखील आपल्या कार्यकर्त्यांनी जिकरीने लढा दिला. तेथे मोठ्या दबाव तंत्राचा वापर झाला. खूप ताकद लावली गेली. मात्र जनतेने दडपशाही झुगारली. राहता तालुक्यामध्येही काँग्रेस पक्षाच्या विचाराला मोठे यश मिळाले आहे. यापुढेही सर्वांनी गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी नामदार बाळासाहेब थोरात जिंदाबाद, या घोषणांसह गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजीने यशोधन परिसर दुमदुमून गेला.

