महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी : कोणतेही शुल्क न आकारता साईबाबा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन शिर्डीमध्ये शुक्रवारपासून (१० नोव्हेंबर) रोज सायंकाळी लेझर शो सुरू केला जाणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांनी दिली.
शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना दर्शनानंतर काय? हा प्रश्न अनेक वर्षापासून पडत असतो. अशा हजारो भाविकांना सहकुटुंब आनंदाची अनुभूती मिळावी, यासाठी साईबाबा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन या लेझर शोची निर्मिती करण्यात आली आहे. या लेझर शोचे उद्घाटन शुक्रवारी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

जय मालपाणी म्हणाले, रोज सायंकाळी सूर्यास्तानंतर साई तीर्थ थीम पार्कच्या प्रांगणात निशुल्क सादर होणाऱ्या लेझर शोला थ्रीडी मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. येथे लेझर शोच्या बरोबरीने जादूचे प्रयोग साई पालखी सोबतच खास मणिपूरहून निमंत्रित केलेल्या कलाकारांची चित्तथरारक ॲक्रोबेट प्रात्यक्षिके रोज सादर होणार आहे.
देश-परदेशातील लाखो साई भक्त रोज शिर्डीत येत असतात साई दर्शनानंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने अठरा वर्षांपूर्वी शिर्डीत वेट एन जॉय वॉटर पार्कची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 2018 मध्ये देशातील पहिल्या साई तीर्थ या धार्मिक थीम पार्कची सुरुवात करण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांना देश परदेशातून येणाऱ्या साई भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या दोन प्रकल्पांच्या यशस्वीतेपाठोपाठ आता नव्याने तयार करण्यात आलेल्या लेझर शोच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मालपणी उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

