शुक्रवार, २१ जून
बीड लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या गोटात हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. असे झाले तर अनेकदा डावलल्या गेलेल्या मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा आनंदाचा धक्का असेल.
दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत मुंडे यांना राज्यसभेवर पाठविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोन सदस्य लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने राज्यसभेतील त्यांच्या जागा व्यक्त झाल्या आहेत. यातील एका जागेवर मुंडे यांना घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आत्महत्या करण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण तापले आहे. ओबीसी नेत्या असलेल्या मुंडे यांना राज्यसभेवर घेण्यासाठी भाजपमधील काही नेते आग्रही असून दिल्लीतील नेतृत्वाकडे या संदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.



