सोमवार, २४ जून
दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे १० वर्षानंतर त्या पुन्हा स्वगृही परततील. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसू शकतो.
नांदेड जिल्ह्यात सूर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. १० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या पाटील यांच्यावर पक्षाने कोणती जबाबदारी दिलेली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता.
भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आज त्या मुंबईत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे.
अशी आहे कारकीर्द… पाटील भाजपमध्ये जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत कार्यरत होत्या. पवार यांनी त्यांना केंद्रात ग्राम विकास राज्यमंत्री या पदावर काम करण्याची संधी दिली होती. मात्र दहा वर्षांपूर्वी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आली आणि त्या भाजपमध्ये गेल्या होत्या. आता त्या पुन्हा स्वगृही परतत असल्याने नांदेड जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


