सोमवार २५ नोव्हेंबर – कराड
विधानसभा निवडणूक पार पडली असून आता महायुतीला सत्ता स्थापनेचे वेध लागले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. अजित दादांनी मिश्किल शब्दात पुतण्याला कोपरखळी मारली. दोघांमधील झालेल्या भेटीतील हा किस्सा आता चांगलाच चर्चेत आला आहे.
आज दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी – यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते कराडला पोहोचले आहे. यात शरद पवारांसह अजित पवारांचाही समावेश आहे. यावेळी त्यांची भेट अगदी काठावर दुसऱ्यांदा निवडून आलेल्या पुतण्या रोहित पवार यांच्याशी झाली. या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल शब्दांत पुतण्या रोहित पवार यांना टोला लगावला आहे. सध्या अजितदादा आणि रोहित पवारांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
भेटीचा व्हिडिओ चर्चेत – यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत निलेश लंके, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील हेदेखील पोहोचले होते. तर, अजित पवार देखील समाधी दर्शनासाठी कराडला पोहोचले आहेत. तिथेच त्यांची भेट रोहित पवार यांच्यासोबत झाली. तेव्हा अजितदादांनी रोहित पवारांना थेट काकांचे दर्शन घेण्याचा आदेश दिला. या भेटीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
काय घडलं काका-पुतण्याच्या या भेटीत – कराडमध्ये प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली. ‘माझी सभा झाली असती तर काय झालं असतं…’ असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला आहे. तसंच, दर्शन घे काकाचं असं म्हणताच काकाच्या पाया पडत अर्थात अजित पवार यांच्यापुढं नतमस्तक होत रोहित पवारांनी वरिष्ठांचा आशीर्वाद घेतला. पण, ‘शहाण्या थोडक्यात वाचलास…’ असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना टोलाही लगावल्याचं पाहायला मिळालं.
भेटी संदर्भात रोहित पवार म्हणाले – ‘ते माझे काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता आहे पण शेवटी काही संस्कृती आहे. एक वडिलधारी व्यक्ती आणि माझ्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली होती. त्यामुळे आणि काका असल्यामुळं शेवटी संस्कृती असल्यामुळं पाया पडणं ही जबाबदारी आहे. ही (कराडची) जी भूमी आहे, तिथं भेदभाव करून चालत नाही, इथं संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही ती पाळतो’, असं रोहित पवार म्हणाले.
Ajit Pawar आणि Rohit Pawar यांची भेट! थोडक्यात वाचलास! माझी सभा झाली असती तर…; अजितदादांचा टोला #ajitpawar #rohitpatil #ncp #maharashtraelectionresults2024 #zee24taas #pawarfamily #yashwantchavan pic.twitter.com/KotMy7VsMH
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 25, 2024




