
सोमवार १६ डिसेंबर
संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात सन २०२४-२५ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या १,८०,९११ साखर पोत्यांचे पूजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. उच्चांकी भाव देण्याची परंपरा कारखान्याने कायम जपली असून चालू हंगामातही १० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवून काम करावे. कारखान्याचे काम हे सतत चालणाऱ्या चाकांचे आहे आणि त्यामुळे परमेश्वराचा आशीर्वाद महत्त्वाचा असून कारखाना व वीज निर्मितीमुळे कारखान्याने कायम ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठी मदत केली आहे.
सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. हीच विकासाची वाटचाल आपल्याला यापुढे कायम ठेवायची असून यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष बाबा ओहोळ यांचे देखील यावेळी भाषण झाले.


