संगमनेर दि. २५ –
राज्य नव्हे तर देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची आणि कारखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समाज माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस, जिल्हा सायबर विभागाकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
थोरात कारखान्याचे एन्व्हायरमेंट केमिस्ट भास्करराव पानसरे यांनी या संदर्भात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनीही अहिल्यानगर सायबर सेल पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमातून विशेषतः काही ठराविक विचाराने प्रेरित व्हाट्सअप ग्रुप वरून काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्यालयीन अधीक्षक शरद गुंजाळ यांच्या बद्दल आक्षेपार्ह व चुकीचा मेसेज समाज माध्यमातून पसरवत बदनामी करत आहे.
पानसरे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, केवळ राज्यालाच नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक ठरलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रगतीची वाटचाल गौरवास्पद ठरली आहे. संगमनेर तालुक्याच्या विकासात या कारखान्याचे मोठे योगदान राहिले आहे. तालुक्याचा विकास पहावत नसलेल्या व विधानसभा निवडणुकीतील निकालाचा गैरफायदा घेऊन काही लोक कार्यकारी संचालक चंद्रकांत घुगरकर व कार्यालयीन अधीक्षक शरद गुंजाळ यांच्या बद्दल आक्षेपार्ह व चुकीचा मजकूर समाज माध्यमातून व्हायरल करत आहे.
दोघांबद्दल चुकीचा मजकूर असलेल्या मेसेज मुळे अनेकांमध्ये गैरसमज निर्माण होत असून त्या संदर्भात अनेकांनी याबाबत विचारणा केली आहे. हा पूर्ण मेसेज आणि माहिती खोटी व काल्पनिक तयार करून कारखान्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे.
थोरात कारखान्याचे व्यवस्थापन, सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर अत्यंत काटकसरीने पारदर्शकपणे व दूरदृष्टीतून काम करत आहे. मात्र या व्हाट्सअप वर तयार केलेल्या खोट्या व काल्पनिक कथेतून कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी व कारखान्याची बदनामी होत असल्याने से मेसेज करणार्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
संगमनेर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी पुढील तपास करत आहे. तपासात काही निष्पन्न झाल्यास खोटी माहिती पसरवत बदनामी करणाऱ्यांना जरब बसण्यास मदत होणार आहे. दरम्यान या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक भान्सी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या सदर्भात तक्रार आल्याचे सांगितले आहे.
थोरात कारखाना व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदनामी प्रकरणी संगमनेर पोलीस व सायबर पोलीस ठाण्यात तक्रार, तपास सुरू
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनीही अहिल्यानगर सायबर सेल पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली आहे.

