
शनिवार, दि. १ मार्च
नाशिक – आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या एका कॅफेमध्ये छापा टाकला असता समोरच्या दृश्य बघून त्यांना देखील धक्का बसला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी यावेळी काही तरुण-तरुणींना ताब्यात घेतले असून या प्रकारामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असून कॅफे संस्कृतीच्या नावाखाली तरुण-तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी अल्प दरात जागा उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना कार्यकर्त्यांनी दिली होती. त्यामुळे या माहितीची पडताळणी करण्यासाठी फरांदे यांनी शनिवारी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः कारवाई करण्याचे ठरविले.
त्यांनी गंगापूर रोड परिसरातील उच्च वस्तीत असलेल्या विद्या विकास सर्कल परिसरामध्ये असलेल्या मोगली नावाच्या कॅफेमध्ये जात तक्रारीची पडताळणी केली असता समोरच्या दृश्य बघून त्यांना देखील धक्का बसला. कॅफेमध्ये स्वतः आमदार कारवाईसाठी गेल्याचे वृत्त समजतात स्थानिक पोलिसांनी देखील तेथे धाव घेतली.

आमदार फरांदे यांनी केलेल्या पडताळणीमध्ये तरुण-तरुणींना शंभर ते दोनशे रुपयांमध्ये गैर कृत्य करण्यासाठी रूम दिले जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांनी या कॅफेमधून अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेतले असून पोलीस कारवाई सुरू आहे.
दरम्यान शहरात कॅफे उघडून त्या ठिकाणी तरुण-तरुणींना प्रवेश दिला जातो. काही कॅफेमध्ये तासानुसार दराची आकारणी केली जाते. कॅफेत अंधार करून काळे पडदे लावले जात असल्याचे समोर आले आहे.



