
मुंबई, दि. १८ मार्च
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काही सदस्यांनी ५ मार्च २०२५ रोजी मांडलेला अविश्वास ठराव सभापती राम शिंदे यांनी नामंजूर केला.
प्रस्तावात तांत्रिक चुका आणि अस्पष्ट मुद्दे असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला. संविधानाच्या अनुच्छेद १८३ (ग) तसेच विधान परिषद नियम ११ व १०३ नुसार, ठरावासाठी १४ दिवसांची पूर्वसूचना आणि स्पष्ट मुद्दा आवश्यक आहे. मात्र, या निकषांची पूर्तता न झाल्याने आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन न झाल्याने सभापतींनी सूचना फेटाळली.

“हा प्रस्ताव अस्वीकार्य आहे, त्याला अनुमती दिली जाणार नाही,” असे राम शिंदे यांनी ठामपणे सांगितले. यामुळे विधान परिषदेत यावर पुढील चर्चा होणार नाही.


