
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि बुद्रुकला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन प्रवरा नदीवरील पुलासह राज्यातील जुन्या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली आहे. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामांच्या दिरंगाईवरही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार खताळ यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. प्रवरा नदीवरील हा पूल वाहतुकीसाठी जुना झाला असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
याचवेळी, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारी रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. शासन निधी उपलब्ध करून देत असतानाही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने, वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची लक्षवेधी सूचना त्यांनी मांडली.

या व्यतिरिक्त, पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा विषयही आमदार खताळ यांनी उपस्थित केला. या दुर्घटनेत चार पर्यटकांचा बळी गेला, तर काही जण जखमी झाले. याप्रकरणी दोषींवर अद्याप कारवाई झाली नाही किंवा चौकशी झाली नाही, याकडे त्यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले.
यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेप्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी आमदार खताळ यांना दिले.


