
नवी दिल्ली:
प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आता संसदेत प्रतिनिधित्व करेल. ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह एकूण चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे.
ॲड. निकम यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी मिळाली आहे.
ॲड. उज्ज्वल निकम यांचे नाव १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजले. या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम पाहिले. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातही त्यांनी सरकारी वकील म्हणून बाजू मांडली, ज्यामुळे दोषी अजमल कसाबला फाशीची शिक्षा झाली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲड. उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती, मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याची चर्चा सुरू आहे.



