

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे:
हडपसर परिसरात मित्राच्या खुनाची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान, त्यानेच रागाच्या भरात आपल्या मित्राचा खून केल्याची कबुली दिली.
आज पहाटे किसन राजमंगल सहा (वय २०, मूळचा बिहार) याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, त्याच्या मित्राला, रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३), तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. हडपसर येथील उंड्री-हांडेवाडी भागात ही घटना घडली असून, रविकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे.
या माहितीनंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रविकुमारला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनेची माहिती देणाऱ्या किसनकडे अधिक चौकशी केली. सुरुवातीला त्याने तीन-चार अनोळखी हल्लेखोरांची खोटी माहिती दिली, की त्यांनी गादी आणि बेडशीट मागितल्याने हा वाद झाला. परंतु, परिसरातील सीसीटीव्ही तपासणीत असे काहीही आढळून आले नाही. पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी किसनची कसून चौकशी केली.
पोलिसी खाक्या दाखवताच किसनने खुनाची कबुली दिली. आम्ही दोघे दारू पीत असताना आमच्यात वाद झाला. त्या रागातून मी लोखंडी रॉडने रविकुमारच्या डोक्यात मारून त्याचा खून केला, असे त्याने पोलिसांना सांगितले.
या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली असून, काळेपडळ पोलिसांनी आरोपी किसन राजमंगल सहा याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.




