संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी स्वच्छ व सुंदर संगमनेरची संकल्पना ठळक करण्यासाठी पुढाकार घेतला असून, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कार्यकर्त्यांनी लावलेले स्वतःचे फ्लेक्स काढून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध आणि विकसित झालेल्या संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून फ्लेक्समुळे विद्रूपीकरण वाढले होते. संगमनेर हायटेक बसस्थानक, इंजिनिअरिंग कॉलेज रोड आणि परिसरासह शहरातील अनेक दर्शनी भागात, चौकात, इमारतींवर, अगदी धार्मिक स्थळांचे सौंदर्य झाकोळून टाकणारे अवैध फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. यामुळे केवळ शहराचे सौंदर्य बिघडले नव्हते, तर राजकीय वाद आणि तणाव वाढून फ्लेक्स फाडण्याच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत होता, यामुळे शांत व सुसंस्कृत वातावरण बिघडत होते.
आमदार सत्यजित तांबे यांनी एक संगमनेरकर म्हणून या समस्येची दखल घेतली. नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, संगमनेर हे केवळ शहर नसून आपली संस्कृती व ओळख आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरात शांतता आणि विकासाच्या योजना राबवून या शहराला वैभवशाली बनवले. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही ‘स्वच्छ व सुंदर संगमनेर’साठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.
ते म्हणाले, “राजकीय कार्यकर्ता म्हणून नाईलाजाने मलाही कधीकधी या स्पर्धेत उतरावे लागले. परंतु तमाम संगमनेरकरांच्या भावना लक्षात घेऊन हे सर्व फ्लेक्स तातडीने काढले जावेत.” शहराच्या दर्शनी भागातील फ्लेक्सचा सुळसुळाट थांबवून, शहराला पुन्हा एकदा चांगले वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
फ्लेक्समुक्तीसाठी केलेल्या या पाठपुराव्यात आमदार तांबे यांनी आदर्श घालून दिला. त्यांनी तत्काळ स्वतःचे सर्व फ्लेक्स काढून टाकले आणि प्रशासनालाही तातडीने सर्व अनाधिकृत फ्लेक्स काढण्याचे आवाहन केले.
- माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापूर्वी संगमनेर हायटेक बसस्थानक पूर्ण झाल्यावर परिसरातील स्वतःचे फ्लेक्स काढण्याच्या सूचना देऊन बसस्थानक परिसर स्वच्छ केला होता. याच धर्तीवर सत्यजित तांबे यांनीही पाऊल उचलल्याने इतर कार्यकर्त्यांपुढेही एक उत्तम आदर्श निर्माण झाला आहे. आमदार तांबे यांच्या या पुढाकारामुळे संगमनेरवासियांनी त्यांचे अभिनंदन केले असून, ‘फ्लेक्समुक्त संगमनेर’च्या दिशेने ही एक सकारात्मक सुरुवात झाली असल्याचे मानले जात आहे.
थोरातांच्या पावलावर पाऊल… ‘मी काढले, तुम्हीही काढा’, आमदार सत्यजित तांबेंचा ‘फ्लेक्स संस्कृती’ला थेट ‘करेक्टिव्ह ॲक्शन’!
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापूर्वी संगमनेर हायटेक बसस्थानक पूर्ण झाल्यावर परिसरातील स्वतःचे फ्लेक्स काढण्याच्या सूचना देऊन बसस्थानक परिसर स्वच्छ केला होता.





आमदार सत्यजित तांबे यांनी एक संगमनेरकर म्हणून या समस्येची दखल घेतली.

