संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच उद्घाटन सोमवारी, (७ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराचा कायापालट झाला असून, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून नागरिक व विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात व्यापक सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत अकोले नाका, त्रिमूर्ती चौक, जनता नगर कॉर्नर, संगमनेर बस स्थानक कॉर्नर, चावडी, तीन बत्ती चौक, चंद्रशेखर चौक आणि नगरपालिका कोर्ट इमारत अशा महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यांचे अधिकृत लोकार्पण सोमवारी केले जाईल.
सुरक्षेसोबतच शहरातील नागरिकांच्या खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनासाठी ‘फूड कोर्ट’ (खाऊ गल्ली) तयार करण्यात आली आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक, संविधान स्मारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक या आगामी प्रकल्पांची अधिकृत माहितीही या कार्यक्रमात नागरिकांना दिली जाणार आहे.
मुख्य लोकार्पण सोहळ्यानंतर संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांच्यासह सर्व माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि विविध राजकीय-सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या महत्त्वपूर्ण सोहळ्यास संगमनेर शहर व परिसरातील नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नगरपरिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक आणि मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे यांनी केले आहे.