धांदरफळ बुद्रुक येथे महावितरणचे वीजमीटर तपासण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शासकीय कामात अडथळा आणून लोखंडी रॉडने व हाताने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ यादव अशोक खाडे (वय ३२, रा. कसारा दुमाला रोड, संगमनेर) हे आपल्या सहकाऱ्यांसह धांदरफळ बुद्रुक येथील ‘मेसर्स प्रदीप इंजिनिअरिंग वर्क्स’ या दुकानाचे वीजमीटर तपासण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रदीप भास्कर धुमाळ, भास्कर रावसाहेब धुमाळ आणि गणेश भास्कर धुमाळ (सर्व रा. धांदरफळ बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी खाडे यांच्याशी वाद घातला.
या दरम्यान प्रदीप धुमाळ व गणेश धुमाळ यांनी खाडे यांना हाताने चापटीने मारहाण केली, तर भास्कर धुमाळ याने लोखंडी रॉडने त्यांच्या मानेवर मागच्या बाजूस प्रहार केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच “परत आमच्या गावात दिसलात तर दोन दिवसांत संपवून टाकू,” अशी गंभीर धमकी देत शासकीय कामात थेट अडथळा निर्माण केला.
या घटनेनंतर जखमी तंत्रज्ञ खाडे यांना घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खाडे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लांघे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.