annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध सुगंधीत मावा तयार करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईत मावा बनवण्याचे इलेक्ट्रॉनिक मशिन आणि सुगंधित तंबाखूचे साहित्य असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांचे पथक पारनेर परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान भाळवणी येथील हॉटेल रुचिराच्या पाठीमागील एका खोलीत बेकायदेशीरपणे सुगंधी तंबाखू, चुना आणि सुपारीचे मिश्रण करून मावा तयार केला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी अमन सुलतान तांबोळी (वय १९, रा. भाळवणी, ता. पारनेर) हा तरुण तयार केलेला मावा प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये भरताना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून मावा तयार करण्याचे १ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक मशीन, ४ हजार रुपये किमतीचा २ किलो तयार मावा आणि १ हजार रुपयांची सुपारी असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी अमन तांबोळी याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, अतुल लोटके, शाहीद शेख आणि अभिजीत अरकल यांच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply