महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग मिळणार आहे. महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखडा २०२६-२७ अंतर्गत संगमनेर बसस्थानक ते प्रवरा नदीवरील पूल या रस्त्याच्या नागरी सुविधांसह सर्वांगीण विकासासाठी १० कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.
स्थानिक आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे शहरवासीयांचा वाहतूक कोंडीचा आणि खड्ड्यांचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.
संगमनेर शहरातील बसस्थानक बांधकाम विभाग कॉर्नरपासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, दिल्ली नाका आणि तीन बत्ती चौक मार्गे प्रवरा नदीच्या पुलापर्यंत जाणारा हा रस्ता शहराचा मुख्य वाहतूक कणा मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो वाहने आणि नागरिकांची प्रचंड ये-जा असते. अनेक दिवसांपासून या मुख्य रस्त्याच्या सुधारणेची मागणी केली जात होती. आता १० कोटींचा निधी मंजूर झाल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण, दर्जेदार डांबरीकरण/सिमेंटिकरण आणि इतर आवश्यक नागरी सुविधांची कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त मिळून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निधीच्या मंजुरीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार अमोल खताळ पाटील यांनी सांगितले की, संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. या रस्त्याच्या विकासकामामुळे शहराच्या वैभवात भर पडेल आणि वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात हलका होईल.
संगमनेरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.