महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यामध्ये दुष्काळाचे अत्यंत भीषण सावट पसरले असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. शेजारील कर्नाटक राज्याने दुष्काळाची तीव्रता ओळखून ज्याप्रमाणे तातडीने चारा छावण्या सुरू केल्या आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही विलंब न करता राज्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज्यातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्य सरकारने केवळ घोषणा न करता शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीनसारखी पिके शेतातून काढण्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपये खर्च आला, मात्र हातात काहीच उरले नाही. पाण्याचा थेंब नसल्याने आगामी रब्बी हंगामही हातातून गेल्या जमा आहे. येत्या काळात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई भासणार असून, विशेषतः दुधाळ जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी अतोनात कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून राज्याबाहेरून किंवा इतर भागांतून चारा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.
शेतात पिकेच नसल्यामुळे हाताला काम उरलेले नाही, ज्यामुळे रोज कमवून खाणाऱ्या शेतमजुरांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने केवळ शेतकऱ्यांचाच नाही, तर शेतमजुरांच्या उपजीविकेचाही विचार करून ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. पुढील १० महिने हे संपूर्ण राज्यासाठी अत्यंत कठीण आणि कसोटीचे ठरणार असून पाणी, चारा आणि पशुधनाचा प्रश्न शेतकरी-शेतमजुरांच्या मुळावर उठणार आहे. कर्जमाफीचे टप्पे केल्यामुळे बँकेच्या व्याजाचा नवा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने यावरही तात्काळ तोडगा काढावा, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या साखर कारखानदारीवरही या दुष्काळाचा मोठा घाला पडला आहे. ऊसाची कमी उपलब्धता, पावसाअभावी वजनात झालेली घट आणि कारखान्यांची वाढलेली क्षमता यामुळे चालू गळीत हंगाम १०० दिवस तरी चालेल का, अशी मोठी भीती निर्माण झाली आहे. साखर कारखानदारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन तातडीने कठोर निर्णय घेणे काळाची गरज असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी सरकारला या गंभीर परिस्थितीची वेळेत दखल घेण्याचे आवाहन केले आहे.