महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरण गाजत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 500 कोटींच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच झोडलं आहे. एका माणसाला आधी स्वार्थासाठी जवळ केलं आणि मग बदनाम करण्यासाठी नियोजनावर प्रश्न उपस्थित करत पत्रकारांवरही या प्रकरणात दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं ते म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भाजपाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भाजपाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नवीन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर 29 मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भाजपा काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी.
मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरंतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यात बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा 2 वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली? खरंतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरंतर याच्यात सरकारमधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहे हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.
मनसे पदाधिकारी आणि नेत्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जरांगे यांना आधी सोबत घ्यायचं, त्यानंतर त्यांना बदनाम करायचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांत फूट पाडायची, असा प्रकार सुरू असून क्लिपमध्ये बोलणारे लोक कोण आहेत, हे आम्हालाही माहिती आहे, असा दावाही राज यांनी केला.
दरम्यान, सत्ता गेल्यानंतर या लोकांच्या अनेक गोष्टी अडचणीत येऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. केवळ वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीने बातमी दिली अथवा नाही, हा मुद्दा नाही. एखाद्या व्यक्तीविरोधात कथित पद्धतीने जनमत तयार करण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केले जातं, हे महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे ही क्लिप आली कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.