महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील खांजापूर येथे अग्नेश्वर मंदिराच्या कामावरून झालेल्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंचायत समिती सदस्य अशोक बबन सातपुते हे शनिवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खांजापूर गावातील अग्नेश्वर मंदिर येथे मंदिराचे सुरू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले होते.
त्याच वेळी तेथे असलेल्या पोपट शिवाजी सातपुते यांनी “देवाचे काम चालू आहे, एवढे पैसे लागणार नाहीत, हे सगळे पुढारी पैसे खातात” असे विधान केले. अशोक सातपुते यांनी “तुम्ही अशी काही बदनामी करू नका व फालतू चर्चा करू नका” असे सांगितले. यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तक्रारदाराच्या अंगावर धावून जात त्यांची गच्ची धरली व अंगातील शर्ट फाडून टाकला. तसेच झटापटीत त्यांचा चष्माही फोडून टाकला. हा भांडणाचा प्रकार पाहून जवळच राहणारे बाळासाहेब मारुती सातपुते हे वाद सोडवण्यासाठी मध्ये आले. त्यावेळी आरोपी पोपट याने हातात लोखंडी गज आणून “तुला मारूनच टाकतो” अशी जीवे मारण्याची थेट धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान या मारहाणीची व यामागील कारणांची चर्चा रंगली होती. या प्रकरणाची दुसरी बाजू अद्याप समोर आलेली नाही.