महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
गेल्या चाळीस वर्षांत विविध सत्तास्थाने मिळूनही संगमनेर शहरातील संजय गांधी नगर आणि वडार वस्ती परिसरातील नागरिकांच्या घरांचा व मालकी हक्काचा प्रश्न सुटू शकला नाही, अशी खरमरीत टीका करत या भागातील रहिवाशांच्या घरांचे उतारे त्यांच्या नावावर करून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
शहरातील वडार वस्ती व संजय गांधी नगर येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. निवडणुकीपुरता मतांसाठी वापर करून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना रोखून आता नागरिकांच्या मनातील भीती दूर केली जाईल आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपण कटिबद्ध राहू, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
यापूर्वी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच मुंबईत बैठक घेऊन या प्रश्नावर पाठपुरावा करण्यात आला असून तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनीही स्वतः या भागाची पाहणी केली होती. त्यामुळे नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.
याचसोबत ‘गाव तेथे शिवसेना शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ हे अभियान राबवून प्रत्येक प्रभागात शाखा उभारल्या जातील आणि त्याद्वारे महिलांचे संरक्षण, रोजगार व बचत गटांना बळ देण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन आमदार खताळ यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, माजी नगरसेवक आप्पा पवार, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, समीर ओझा, मार्गदर्शक प्रकाश पवार, शाखाध्यक्ष अण्णा शिंदे, उपाध्यक्ष संजय शिंदे, सोमनाथ रणसुरे, कार्याध्यक्ष संपत पवार, सचिव आकाश पवार, खजिनदार सुनील पवार, संघटक दिलीप पवार, मारुती चव्हाण, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख दीपाली वाव्हळ, रेखा गलांडे यांच्यासह संजय गांधी नगर आणि वडार वस्ती परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवती व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.