महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्याला विकासाची आणि सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा लाभली असून, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात यापुढेही तालुक्याचा विकासाचा वेग असाच कायम राखला जाईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे.
चिकणी येथे ५७ लाख रुपये निधीतून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी रामहरी कातोरे, अजय फटांगरे, कॉम्रेड कारभारी उगले, विलास वर्पे, भारत वर्पे, मोहनराव करंजकर, भारत शेलकर, शेतकरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, रमेश वर्पे, दर्शन वर्पे, सचिन वर्पे, प्रशांत वर्पे, पंकज हासे, संदीप वर्पे आणि राहुल मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते भागवत बाबा मंदिर परिसर सुशोभीकरण, जिल्हा परिषद शाळा खोली आणि पशुवैद्यकीय दवाखान्याची संरक्षण भिंत या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
आमदार तांबे म्हणाले की, राज्यामध्ये कुठेही गेल्यास संगमनेरकर म्हणून प्रत्येक जण अभिमानाने आपली ओळख सांगतो, जी एका दिवसाच्या परिश्रमातून नाही तर अनेक वर्षांच्या अखंड प्रयत्नांतून निर्माण झाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून जिल्ह्याला आणि तालुक्याला कायमस्वरूपी पाणी मिळवून दिले आहे.
मागील चाळीस वर्षांत स्वतःच्या कष्टाने हा तालुका उभा राहिला असून, गावोगावी विकासाच्या योजना राबवून प्रत्येक नागरिकाला मान सन्मान मिळवून दिला आहे. राजकारण हे गोरगरिबांच्या विकासासाठी करायचे असते, असे संस्कार सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिले असून, याच विचारांवर चालत चिकणीसह संपूर्ण तालुक्यात विक्रमी विकासकामे केली गेल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना रामहरी कातोरे यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून गावागावांत झालेली विकासकामे, रस्त्यांचे आणि बंधाऱ्यांचे जाळे अधोरेखित केले. तसेच तरुणांना जातीधर्माच्या नावावर द्वेष पसरवणाऱ्या घटकांच्या विरोधात सावध राहण्याचे आवाहन केले.
कॉम्रेड कारभारी उगले यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श संस्कारांमुळे घडलेल्या या तालुक्यात सत्ता येते आणि जाते पण लोकनेता कायम जनतेतच असतो, असे सांगत सर्वांना बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
शेतकरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे यांनी प्रास्ताविक करताना बेरोजगारी, महागाई, शेतकरी कर्जमाफी आणि नोकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप थोरात यांनी केले तर आभार भारत वर्पे यांनी मानले.