महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
ठाण्यातून सुरु झालेल्या शिवसेनेच्या महा प्रबोधन यात्रेत पंतप्रधान मुख्यमंत्र्यांवरील टिका शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीची ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल व मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत या तिघांसह पाच जणांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, विनायक राऊत, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. यावेळी अंधारे व जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती, तर राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते.
शिवसेना नेत्यांची ही कृती मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थकांच्या चांगलीच मनाला लागली होती. शिवसेनेच्या नेत्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने याला ठाकरे गटाकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते हे लवकरच समजेल.
शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी गोठवून निवडणूक आयोगाने ठाकरे-शिंदे गटाला धक्का दिला. त्यामुळे शिंदे यांनी भाजपच्या मदतीने शिवसेना संपविल्याची टीका होत आहे. यापुढे चिन्हाचा आणि शिवसेना नावाचा वापर दोन्ही गटांना करता येणार नसून दोन्ही गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी चिन्हे आणि नावांना मान्यता दिली आहे.
ठाकरे यांनी शिवतीर्थावरील तर शिंदे यांनी बीकेसीवरील दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार टीका केली होती. यामुळे दोन्ही सत्ताकारण चांगलेच तापले आहे. गद्दारांनी निशाणीच गोठविली नाही तर रक्तदेखील पेटविले असल्याचे जाहीरपणे सांगितले जात असल्याने येत्या काळात शिवसेनेच्या दोन्ही गटातील हा सत्तासंघर्ष चांगलाच विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.

