महाराष्ट्र संवाद न्यूज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या माजी सहसचिव आणि अकोले तालुक्यातील इंदोरी येथील शेतकरी कन्या शर्मिला येवले हिने मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. येवले यांच्यासोबत आणखी सोळा पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली असल्याची माहिती मिळते.
पक्षांतर्गत असलेल्या मतभेदांवर भाष्य करत येवले यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या दुसऱ्या पक्षात जाण्याची चर्चा सुरू झाली असताना त्यांनी वरून सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेतच म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात राहण्याला पसंती दर्शविली होती.
मात्र त्यानंतर देखील येवले पक्षामध्ये फारशा सक्रिय राहिल्या नाही. मध्यंतरी त्या आपल्या काही सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्या पदाला शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देखील स्थगिती देण्यात आलेली होती.
अखेरीस शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची साथ करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या समवेत आणखी 16 युवतींनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. येवले यांच्या प्रवेशानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. माझ्यासोबत ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता ते सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे येवले यांनी सांगितले आहे.

कोण आहेत शर्मिला येवले
प्रभावी भाषण शैली असलेल्या शर्मिला यांनी मराठा क्रांती मोर्चात भाषण केले होते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेवर त्यांची नियुक्ती झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला. परंतु, २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईफेक केल्यानंतर शर्मिला येवले प्रकाशझोतात आल्या. येवले यांना ऑक्टोबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. यासाठी शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला होता. पुढे युवासेनेचे पद त्यांना मिळाले होते.

