महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊनही उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसच्या शिस्त विषयक समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. तांबे यांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही याची चौकशी होईपर्यंत राहणार आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारी, बंडखोरी आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे या मतदारसंघासोबत राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे.
या मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या डॉ. तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलाच नाही. उलट त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तांबे पिता-पुत्राच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा अर्जच दाखल झाला नाही. या घडामोडींमुळे आता पक्षाने तांबे यांच्यावर कारवाई केली आहे.
तांबे यांच्या निलंबनाचे पत्र काँग्रेसच्या शिस्त विषयक समितीचे सदस्य सचिव तारीक अन्वर यांनी माध्यमांना पाठविले आहे.

