महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक / अहमदनगर : ३० जानेवारीला होणाऱ्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली.
पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसले तरी देखील अपक्ष म्हणून दोन्ही पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना कोणाचा पाठिंबा मिळतो हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी देखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे.
सत्यजित सुधीर तांबे (संगमनेर) आणि शुभांगी भास्कर पाटील (धुळे) या दोन प्रमुख उमेदवारांसह रतन कचरु बनसोडे (नाशिक, वंचित बहुजन आघाडी), सुरेश भिमराव पवार (नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), अनिल शांताराम तेजा, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, ईश्वर उखा पाटील, ॲड. जुबेर नासिर शेख (धुळे), अविनाश महादू माळी (नंदूरबार), इरफान मो इसहाक (मालेगाव), बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नितीन नारायण सरोदे (नाशिक), ॲड.सुभाष राजाराम जंगले (श्रीरामपुर), पोपट सिताराम बनकर, सुभाष निवृत्ती चिंधे, (अहमदनगर), संजय एकनाथ माळी (जळगाव) या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात १,१५,६३८ इतके आहेत. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ६९,६५२ इतके, जळगाव जिल्ह्यत ३५,०५८ इतके, धुळे जिल्ह्यात २३,४१२ इतके तर सर्वात कमी नंदूरबार जिल्ह्यात १८,९७१ इतके मतदार आहेत.
विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे
नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.

