महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते महाराष्ट्रात ३८,८०० कोटींपेक्षा जास्त विकासकामाकांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शोसुद्धा करणार आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आजच्या मुंबई दौऱ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत येतील. तर, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई मेट्रो मार्ग २ ए आणि ७ चं उद्घाटन करतील. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोमध्ये जवळपास एक लाख लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे. मुंबईसहित अनेक महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अशावेळी होत असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची नांदी ठरणार आहे.
मोदींचा असा असेल मुंबई दौरा
# पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो मार्ग २ ए आणि ७ चे उद्घाटन करणार आहे. या मेट्रो मार्गांसाठी जवळपास १२,६०० कोटींचा खर्च झालेला आहे.
# पंतप्रधान नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डाचेही उद्घाटन करणार आहे.
# सात एसटीपी प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे.
# भांडूप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सिद्धार्थनगर हॉस्पिटल आणि ओशिवरा प्रसुतीगृहाच्या पुनर्विकासाचीही ते पायाभरणी करणार आहेत.
# मुंबईत जवळपास ४०० किमी रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचेही मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
# छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कायापालट करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कामालाही मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

