महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : जय हिंद महिला बचत गट आणि संगमनेर शहर महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी “होम मिनिस्टर” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात व संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली.
संगमनेर तालुक्यात महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता. २५) जानेवारीला सायंकाळी पाच वाजता जाणता राजा मैदान येथे न्यू होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात प्रामुख्याने सिने अभिनेते क्रांती (नाना) मळेगांवकर व बाल गायिका सह्याद्री मळेगांवकर हे सादरकर्ते असणार आहे.
यावेळी उपस्थित महिला श्रोत्यांसाठी प्रश्नोत्तरे, उत्कृष्ट उखाणे, पारंपारिक सुंदर वेशभूषा यांसारख्या विविध आनंदी कार्यक्रमांमधील विजेत्या महिलांसाठी आकर्षक अशी ४० बक्षिसे असतील. यात प्रथम क्रमांक मिळवणार्या महिलेस पैठणी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून सदर कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत सुनीता कांदळकर, पुनम मुंदडा, शिला करंजेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

