महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेत मोठे बंड करत ४० आमदारांना सोबत घेत भारतीय जनता पक्षाच्या साथीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना अद्याप लोकप्रियता लाभल्याचे या सर्वेक्षणातून दिसत नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र देशातील टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत यावेळी महाराष्ट्राचा नंबर घसरला आहे.
तसेच, राज्यात आता लोकसभेची निवडणूक झाल्यास युपीएला ३४ जागांवर विजय मिळेल, असे इंडिया टुडे सी वोटरने (India Today-C Voter) केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. इंडिया टुडे सी वोटरने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणात देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे.
या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तर महाराष्ट्रात सत्तांतर घडविणारे आणि राज्यात सामान्य माणसाचे सरकार अस्तित्वात असल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या लोकप्रियतमध्ये घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे देशातील टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत. त्यांना केवळ २.२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अद्याप मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेने मनापासून स्वीकारले नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, कोरोना काळात ‘मूड ऑफ नेशन’कडून सर्वेक्षण केले जात होते. त्यावेळी सर्वेक्षणात सातत्याने टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे अग्रेसर असायचे.
परंतु, ‘मूड ऑफ नेशन’च्या यंदाच्या टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे आठव्या क्रमांकावर आहे. भाजपाने अनेक राजकीय गणितांचा विचार करुन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. या सर्वेक्षणात देश ते राज्य पातळीवरील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच, देशातील टॉप टेन मुख्यमंत्री कोण, यासाठी जनतेकडून कौल घेण्यात आला.

