महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी संगमनेर नगर परिषदेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली होती.
शहरातील बाजारपेठ, तेलीखुंट चौक, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक या प्रमुख मार्गावरुन ही मिरवणूक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता झाली.
प्रारंभी संगमनेर नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या एका व्यासपीठावर संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याधिकारी राहुल वाघ, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, उप मुख्याधिकारी सुनील गोरडे, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन शिव जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्यावतीने मान्यता देण्यात आलेले महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताचे मान्यवरांच्या उपस्थितीत समूहगान गायले गेले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शिवरायांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी संगमनेर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या शुभहस्ते उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नगरपरिषद प्रांगणातून सुरुवात करण्यात आलेल्या शिवरायांच्या प्रतिमेची नगरपरिषदेपासून शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भगवे फेटे परिधान केल्यामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण दिसत होते. शिवरायांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. याप्रसंगी नगरपरिषदेच्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता व विद्युत विभागाच्या वतीने रोषणाईची व्यवस्था उत्तम रीतीने पार पाडली.

