महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर :
संगमनेरमध्ये आरटीओ कार्यालय सुरू करावे, बसस्थानकास हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नांव देण्यास यावे, अशी मागणी संगमनेर शिवसेना तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. काळे यांनी शिंदे यांची भेट घेत दिलेल्या या निवेदनाबद्दल मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने संगमनेर येथे परिवहन विभागाचे कार्यालय होणे गरजेचे असून सध्या आम्हाला परिवहन विभागाच्या कामांसाठी श्रीरामपूर येथे ५५ किलोमीटर अंतर जावे लागत आहे. तसेच श्रीरामपूर आरटीओ येथे कामाचा व्याप वाढलेला असल्यामुळे बऱ्याच वेळेस संगमनेर येथील नागरिकांची कामे प्रलंबित राहत असतात.
तसेच online प्रक्रिया झाल्यापासून त्याचे स्लॉट नुसार कामकाज सुरू असते. यामध्ये लिमिटेड कोटा असल्यामुळे कामे प्रलंबीत राहत आहे. संगमनेर व अकोले येथील वाहन चालकांच्या अडचणी लक्षात घेऊन नवीन परिवहन कार्यालयास मंजुरी देण्यात यावी. त्यासाठी संगमनेरमध्ये पुरेशा प्रमाणात शासकीय जागा सुद्धा उपलब्ध आहे.
तसेच संगमनेर येथील बस स्थानक व व्यापारी संकुलाचे काम २०१९ मध्ये पूर्ण झालेले असून त्यामधे शंभरावर व्यावसायिक व्यवसाय करत आहे. यापूर्वी आम्ही स्थानिक पातळीवर याबाबत मागणी केली होती. परंतु त्यावेळेस स्थानिक आमदार बाळासाहेब थोरात यांनी व बीओटी विकासक कातोरे यांनी ती मागणी हाणून पाडलेली आहे. त्यामुळे आपण या व्यापारी संकुल व बसस्थानकाला हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणेबाबत एस टी विभागास आदेश द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे यांनी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन देतेवेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

