महाराष्ट्र संवाद न्यूज
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल आहे. आयोगाच्या या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधून क्रिया प्रतिक्रियांचा महापूर आलेला असतानाच विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उदाहरण दिलं होत. ते म्हणाले होते, राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार आहे. या एकमेव आमदाराने जर उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझा पक्ष, आणि इंजिन हे निवडणूक चिन्ह देखील माझेच असल्याचा दावा केला तर, तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय घेतला होता, तोच निर्णय देणार का? असा सवाल केला होता.
पवार यांच्या या प्रतिक्रिया नंतर समाज माध्यमांवर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उदाहरण देणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत उत्तर दिले आहे.
राज ठाकरे म्हणाले,
“म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतोय. महाराष्ट्रात जे काही चालू आहे, जे झालंय या विषयावर सविस्तर २२ तारखेला शिवतीर्थावर गुढी पाडव्याला बोलणार आहे. मी कोणतेही ट्रेलर, टीझर दाखवणार नाही. मी थेट २२ तारखेला सिनेमाच दाखवेन”
त्यामुळे ठाकरे आता शिवतीर्थावर ठाकरे आपल्या शैलीत नेमका कोणाचा समाचार घेणार, बदलत्या राजकारणावर काय भाष्य करणार, नेमकी काय भूमिका मांडणार याकडे राज्यातील जनतेसह सर्वच पक्षाचे लक्ष लागले आहे.

