महाराष्ट्र संवाद न्यूज
अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली. तसेच भर अधिवेशनात अध्यक्षांसमोर “संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”, असं वक्तव्य केलं.
राणे बुधवारी (१ मार्च) सभागृहामध्ये राऊतांनी विधिमंडळावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना बोलत होते. खासदार राऊत यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे.
राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. ते सामनात येण्याआधी त्यांचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं. शिवसेनेच्या विरोधात लिहिलं. “बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही, असं संजय राऊतांनी लिहिलं होतं.
राऊतांना दिलेलं संरक्षण काढा. ते पोलिसांचं संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेलं संरक्षण आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं.
“संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”
“त्यांनी मार्मिकमध्ये छापलेलं कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचं १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असं वक्तव्य राणेंनी केल आहे.

