महाराष्ट्र संवाद न्यूज
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी त्यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. घटना घडली तेव्हा शिवराज पाटील चाकूरकर हे दिल्ली होते.
चंद्रशेखर पाटील हे 80 वर्षांचे होते, ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातुर येथील घराच्याजवळ राहत होते. दररोज वृत्तपत्र वाचण्यासाठी आणि सहज फेरफटका मारण्यासाठी चाकूरकर यांच्या घरी ते यायचे. आजही ते सहजपणे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ‘देवघर’ या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी स्वतः सोबत आणलेल्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेतली.
फायरचा आवाज झाल्यानंतर चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे हॉलमध्ये आले, तेव्हा चंद्रशेखर पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. या घटनेत संशयास्पद असलेल्या गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.
मयत चंद्रशेखर पाटील यांचे चिरंजीव लिंगराज पाटील आणि नातेवाईक घटनास्थळी पोहचले. चंद्रशेखर पाटील यांना अनेक आजार होते. वयोमानानुसार ते आजारांना कंटाळले असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चंद्रशेखर पाटील हे शेती पाहत होते. त्यांना दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली आहेत.

