महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई:
सत्ता संघर्षाच्या न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारी झालेल्या गुढीपाडव्याला आपला ८ महिने २२ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. हा कालावधी पूर्ण करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जुन्या सहकारी मित्राचा विक्रम मोडला असून सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे शिवसेनेचे ते तिसरे मुख्यमंत्री ठरले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांनी मागे टाकले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठी फुट पाडत चाळीस आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणी करत नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री पद मिळविले. मुख्यमंत्रीपद मिळविणारे शिवसेनेचे ते चौथे मुख्यमंत्री ठरले. यापूर्वी मनोहर जोशी, नारायण राणे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळाले होते. मात्र तिघांपैकी एकही मुख्यमंत्री आपला पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाही.
मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक कार्यकाल मिळाला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. आता शिंदे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहाणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. पक्षातील मोठ्या फुटी नंतर शिंदेंनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाणचिन्ह मिळविले असले तरी ते मनोहर जोशी व उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाची बरोबरी करण्याची शक्यता कमी दिसते. आणखी किती काळ मुख्यमंत्री पदावर राहतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद मिळविलेले आणि सध्या भाजपमध्ये केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांच्या वाट्याला मुख्यमंत्री पदाचा सर्वात कमी कार्यकाळ आला. राणे ८ महिने १७ दिवस मुख्यमंत्री होते त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा विक्रम मोडत आता शिंदे यांनी ८ महिने २२ दिवस मुख्यमंत्री पदावर राहाण्याचा विक्रम केला आहे. उद्धव ठाकरे हे २ वर्षे ६ महिने २९ दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.
असा आहे शिवसेना नेत्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ…
मनोहर जोशी – १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ (३ वर्षे १० महिने १६ दिवस)
नारायण राणे – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ (८ महिने १७ दिवस)
उद्धव ठाकरे – २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ (२ वर्षे ६ महिने २९ दिवस)
एकनाथ शिंदे – ३० जून २०२२ पासून आत्तापर्यंत विद्यमान मुख्यमंत्री.

