महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – सावित्रीबाई फुले वसतीगृहात २१ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने बलात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते व सुप्रदा फातर्पेकर यांनी आज वसतिगृहातील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आयोग त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला.
त्यानंतर आयोगाच्या या दोन्ही सदस्यांनी वस्तीगृहाची पाहणी करत संचालक आणि व्यवस्थापनाची भेट घेतली. या भेटीत अनेक त्रुटी आणि प्रशासकीय उणिवा समोर आल्या आहेत. यात प्रामुख्याने वस्तीगृहातील सीसीटीव्ही गेले वर्षभर बंद आहेत. मनुष्यबळाची कमतरता असून महिला सुरक्षा रक्षक नाही. मुलींना तक्रार करण्यासाठी तक्रार पेटी किंवा कुठलाही संपर्क क्रमांक देण्यात आलेला नाही. वस्तीगृहाच्या अधीक्षकांकडे अतिरिक्त कार्यभार असल्याचे पाहणीत समोर आले असल्याचे रूपवते यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला सांगितले.
तसेच त्यांनी मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला भेट देत तपास कामाबाबत माहिती घेतली.
✓ पिडीतेने याआधी सुद्धा आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं होतं पण कुठलीच कारवाई केली गेली नाही. असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासर्व बाबींची सखोल चौकशी केली गेली पाहिजे.
उत्कर्षा रुपवते

