महाराष्ट्र संवाद न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये मोठी पक्षीय घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करत त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी पवार यांनी सोपविली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा नवी दिल्लीमध्ये वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिन सोहळ्यात पवार यांनी ही घोषणा केली. कार्यकारी अध्यक्षपदी दोघांची निवड करताना या दोघांकडे त्यांनी वेगवेगळ्या राज्याची जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्रासह पंजाब आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे तर मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंड या राज्यांची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पक्षात भाकरी फिरविण्याचे संकेत देणाऱ्या शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या राजीनामाच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव अध्यक्ष कोण असेल याबाबत राजकीय चर्चा रंगल्या होत्या. पवार यांनी पटेल आणि सुळे यांच्या नावाची घोषणा करतानाच सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील जबाबदारी दिली आहे तटकरे यांच्याकडे ओडिसा पश्चिम बंगाल शेती अल्पसंख्यांक या विभागाची तर जितेंद्र आव्हाडाकडे बिहार छत्तीसगड जम्मू काश्मीर कर्नाटक कामगार विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजित पवारांचे नो कॉमेंट्स
नव्या निवडीचे जोरदार ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले असले तरी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अजित पवार यांना या संदर्भात त्यांनी विचारले असता, ‘या आवाजात मला काही ऐकू येत नाही’ असे सांगत बोलणे टाळले. यानंतर ते थेट गाडीतून रवाना झाले. नव्या निवडी संदर्भात अजित पवार यांची भूमिका लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

