महाराष्ट्र संवाद न्यूज
आत्महत्या करण्याच्या विचारात तो बियर बारमध्ये बियर पिण्यासाठी आला, त्याने बियर मागविली, अर्धी बियर पिला आणि उरलेली अर्धवट सोडून निघून गेला. नेमकं याचवेळी कोणी बघत नाही ही संधी साधून वेटरने ती अर्धी बियर फस्त केली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
प्रत्येकाचा मृत्यू विधीलिखित आहे. कोण किती वर्ष जगणार आणि केव्हा व कसा मारणार याची कोणीच कल्पना करू शकत नाही. बऱ्याचदा मनुष्य मृत्यूच्या दारातून परत आल्याची तर अनेकांना अनपेक्षितरित्या मृत्यूने गाठल्याची उदाहरणे आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजरू शहरात समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार राजरू मधील सोमनाथपूर मटन मार्केट बाजूला असलेल्या एका बियर बारमध्ये ही घटना घडली. या बियर बारमध्ये बियर पिण्यासाठी एक तरुण आला होता. त्याने बियर मागविली. की अर्धवट पिऊन तो काही वेळानंतर बारमधून निघून गेला. त्याच्या अर्धी बिअर शिल्लक असल्याचे वेटरच्या लक्षात आले. कोणाचं लक्ष नसल्याचे पाहत त्याने ती अर्धी बिअर पिऊन टाकली.
पण बियर प्यायलानंतर लगेचच त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो जागेवरच बेशुद्ध अवस्थेत कोसळला. अचानक झालेल्या या प्रसंगाने बारमध्ये खळबळ उडाली आणि धावपळ माजली. उपस्थितानी वेटरला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली.
नक्की काय घडलं…
बारमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या त्या तरुणाने आत्महत्या करीत जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने बियर पीत असताना बियरच्या बाटलीत विषारी द्रव्य मिसळलं. पण अर्धी बियर प्यायल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो बारमधून बाहेर पडला. बार पासून काही अंतर पार केल्यानंतर तोही जागीच कोसळला. आसपासच्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
या तरुणाने स्वतःचे जीवन संपविण्यासाठी बियरच्या बाटलीत विष मिसळलं असल्याचं वेटरला माहित नव्हतं. तो ही विषारी बियर प्यायला आणि दुर्देवाने त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्याला आत्महत्या करायची होती तो जगला आणि ज्याला जगण्याची इच्छा होती त्याला मृत्यूने गाठलं. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून त्यांनी विषारी बियरची बाटली ताब्यात घेतली वैद्यकिय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली आहे.

