महाराष्ट्र संवाद न्यूज
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील सक्रिय कार्यकर्ते, थोर स्वातंत्र्य सेनानी एस. एम. जोशी यांचे अनुयायी असलेले ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते साथी विनायक माळवे यांची जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष साथी नाथाभाऊ शेवाळे यांनी साथी माळवे यांना संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर नियुक्तीपत्र दिले. समाजवादी विचारांचा वडिलोपार्जित वारसा असलेले साथी विनायक माळवे आजही जनतेच्या प्रश्नाबाबत पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
माळवे यांनी पुणे जिल्ह्यात असताना जनतेच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली. धरणग्रस्त, आदिवासी बांधवांचे प्रश्न, बेकारी, महागाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव यासाठी तत्कालीन समाजवादी नेते साथी भाई वैद्य, श्रमिक नेते डॉ. बाबा आढाव, डॉ. बापूसाहेब काळदाते, स्वातंत्र्य सैनिक साथी दुर्वे नाना, विडी कामगार नेते साथी सायन्ना एनगंदुल आदींसोबत भरीव काम केले आहे.
जनता दल प्रदेश सचिवपदी नियुक्ती केल्याबद्दल साथी माळवे यांनी देशाचे माजी पंतप्रधान व जनता दलाचे (सेक्युलर) राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा, उपाध्यक्ष साथी श्रीपादराव शिंदे, प्रदेशाध्यक्ष साथी नानाभाऊ शेवाळे यांचे आभार मानत येत्या काळात पक्षाची ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले.

