महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – सध्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सर्रासपणे दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांकडून हा उपद्रव थांबवण्यासाठी गुरुवारी अवैध दारू विक्रेत्यांची धरपकड करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 खाली या सर्वांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी दारू दुकाने बंद असली तरी अवैध विक्री करणाऱ्यांकडून मध्य प्राशन करणाऱ्यांना दारू उपलब्ध होत असते. दारू पिणारे लोक दारू पिऊन मिरवणुकांमध्ये गैरवर्तन करतात. त्यामुळे गणपती मंडळाची देखील बदनामी होते. शिवाय विविध प्रकारचे गुन्हे देखील घडतात.

या गैरप्रकाराना प्रतिबंध होऊन सार्वजनिक गणपती मंडळाच्या मिरवणूक शांततेमध्ये पार पाडाव्या यासाठी संगमनेर उपविभागातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दारू विक्रेत्यांनाच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 खाली पोलीस स्टेशन येथे डिटेन करून ठेवण्यात आले.
या कारवाईमुळे दारू पिणाऱ्या व्यक्तींपासून मिरवणुकांमध्ये होणारा उपद्रव थांबून मिरवणूक शांततेमध्ये पार पडतील अशी अपेक्षा आहे. त्याच अपेक्षेने सदरची कारवाई करण्यात आली असल्याचे डीवायएसपी वाघचौरे यांनी म्हटले आहे.


