महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी करून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिर्डी वाहतूक शाखेतील पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सिन्नर-शिर्डी रोडवर करण्यात आली.
अशोक रामा शिंदे (वय ४६, बक्कल क्रमांक ७९२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलिस हवालदाराचे नाव आहे. ते शिर्डी शहर वाहतूक शाखेशी संबंधित असून सध्या शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात संलग्न असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील तक्रारदार ३२ वर्षीय असून त्यांचा गौण खनिज वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना वाळू डिलिव्हरीची ऑर्डर मिळाली होती.
वाळू वाहतूक सुरू असताना आरोपी हवालदाराने तक्रारदाराचे हायवा वाहन अडवून कारवाई न करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा ५० हजार रुपये हप्त्याची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पडताळणी केली. त्या वेळी तडजोडीअंती दरमहा ४० हजार रुपये देण्याची मागणी आरोपीने केल्याचे नमूद आहे.
त्यानंतर रचलेल्या सापळ्यानुसार, सिन्नर-शिर्डी रोडवर पंचासमक्ष तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अशोक रामा शिंदे यांना पथकाने ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक योगेश भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून त्यात पोलिस कर्मचारी विनोद चौधरी, नितीन नेटारे, प्रमोद पाळंदे व सापळा पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडूनच अशा प्रकारे हप्ते मागितले जात असल्याच्या घटना समोर येत असल्याने, केवळ एका कर्मचाऱ्याच्या अटकेवर न थांबता या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून पाळेमुळे शोधली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.






