महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर नगरपरिषदेच्या नूतनीकरण केलेल्या कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला खरा, पण आता या सोहळ्यावरून शहरात जोरदार राजकीय ‘नाट्य’ रंगले आहे. राजकीय दबावाखाली येऊन की कोणाच्या इशाऱ्यावर, असा सवाल उपस्थित करत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी अवघ्या दोन दिवसांतच या सोहळ्यावरून यू-टर्न घेतला आहे. “तो लोकार्पण सोहळा अधिकृत नव्हताच,” असा अजब खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केल्याने पालिकेच्या भोंगळ आणि दुटप्पी कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. या कार्यक्रमात स्वतः मुख्याधिकारी यजमानाच्या थाटात ‘नटून थटून’ मिरवत होते, त्याच कार्यक्रमापासून आता पालिकेने हात झटकल्याने संगमनेरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे नूतनीकरण आणि दोन दिवसीय नाट्यप्रयोगांचा भव्य सोहळा पार पडला. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खुद्द मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या सोहळ्याला संगमनेरचे विद्यमान महायुतीचे आमदार अमोल खताळ यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने तालुक्यात राजकीय वादळ उठले.
हा राजकीय वाद पेटताच मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी ठराविक पत्रकारांना बोलावून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “नाट्यगृहाचे काम अद्याप अपूर्ण आहे. सन २०२४ च्या निधीतून काही कामे झाली असली तरी उर्वरित कामांसाठी निधी आल्यानंतरच पालिकेच्या वतीने अधिकृत लोकार्पण केले जाईल. २३ व २४ नोव्हेंबरचा कार्यक्रम केवळ ‘जयहिंद लोकचळवळ’ संस्थेने आयोजित केला होता, पालिकेचा त्याच्याशी अधिकृत संबंध नाही,” असे गोरे यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकाऱ्यांच्या या विधानामुळे आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जर हा कार्यक्रम पालिकेचा नव्हता, तर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्याधिकाऱ्यांचे नाव कसे आले? एवढेच नव्हे तर विकल्या गेलेल्या तिकिटांवर आणि पत्रिकांवर नगरपरिषदेचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) कसे छापले गेले? त्यावेळी पालिका प्रशासन झोपले होते का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कार्यक्रमापूर्वी पूर्णत्वाच्या दाखल्याबाबत विचारले असता ‘दाखल्याची गरज नाही’ म्हणणारे मुख्याधिकारी, आता मात्र ‘काम अपूर्ण आहे’ अशी पलटी मारत आहेत. अपूर्ण इमारतीत मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून नाट्यप्रयोगांना परवानगी दिलीच कशी, असा सवालही उपस्थित होत आहे. राजकीय वर्तुळातील दबावापुढे झुकून मुख्याधिकाऱ्यांनी आपली भूमिका बदलल्याची चर्चा शहरात रंगली असून, जनतेची दिशाभूल करणाऱ्या आणि नियमांना बगल देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवरच कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी आता संगमनेरकरांमधून होत आहे.






