महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अद्यावत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे लोकार्पण दुष्काळी परिस्थितीमुळे साध्या पद्धतीने पार पडले. या नाट्यगृहाचे लोकार्पण विरोधकांना सहन न झाल्याने त्यांचा पोटशूळ उठला असून, कोणतेही योगदान नसलेले लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका गटनेत्या दिपाली पंचारिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह हे १,००० आसन क्षमतेचे असून, ते तालुकास्तरावरील एक मोठे व अत्याधुनिक नाट्यगृह ठरले आहे. या नाट्यगृहामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संगमनेरमध्ये अद्यावत नाट्यगृह व क्रीडा संकुल उभारण्याचे स्वप्न होते. २०११ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात बंदिस्त नाट्यगृहासाठी पाठपुरावा सुरू झाला. त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शासकीय स्तरावर सातत्याने मदत केली, तर आमदार सत्यजित तांबे यांनी नगर विकास, सांस्कृतिक व मराठी भाषा विभागाकडे पाठपुरावा केला. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या भेटी घडवून आणण्यासह मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर विविध विभागांतून निधी उपलब्ध होऊन हे नाट्यगृह साकारले आहे.
यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने लोकार्पण सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करावा, अशी सर्व नगरसेवक व नगरसेविकांची इच्छा होती. त्यानुसार साध्या पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. तसेच सुरुवातीला दोन नाट्यप्रयोगांचे आयोजन करून त्यातून जमा झालेली ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची रक्कम दुष्काळ निधीसाठी देण्यात येणार आहे.
या नाट्यगृहाचा जिल्हा व राज्यात गौरव झाल्यानंतर विरोधकांनी राजकीय दबाव वापरून मुख्याधिकाऱ्यांना पत्रक काढण्यास भाग पाडले. कोणतेही काम न करता केवळ राजकारण करणे, अडवणूक निर्माण करणे आणि फ्लेक्सबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे चुकीचे व दुर्दैवी असल्याचे पंचारिया यांनी म्हटले आहे. नाट्यगृहाचे लोकार्पण पूर्ण झाले असून विविध उपक्रमांना सुरुवात झाली आहे; आजपासून कवी अनंत फंदी व्याख्यानमालाही सुरू होत आहे.
दरम्यान, संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने शिंदे व सामंत यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडून लवकरच उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाणार आहे.






